खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय ?

                  खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय ?


जिच्याभोवती वहितीला जमीन आहे आणि जिच्यामध्ये मातब्बर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत अशा वस्तीला गाव म्हणतात. काहींच्या मते. गायीवरून गाव शब्द आला. गावाच्या हद्दीला शिव म्हणतात. कुठल्याही गावाचे दोन भाग पडतात. राहण्यायोग्य भागाला पांढरी किंवा गावठाण आणि शेतीच्या भागाला काळी किंवा शिवार म्हणतात. शिवारात एकदोन घराची वस्ती असेल तर त्याला झाप, आवसा, कोठा, गोठा, पडाळ म्हटले गेले. पाचदहा घरांची वस्ती असेल तर त्या वस्तीला वाडा, वाडी, मजरे, पाडा म्हटले जाते. खेडे आणि गाव हे दोन समानार्थी शब्द म्हणून वापरतात. खेड्याला तेलगूत पल्ली किंवा ऊर तर कन्नडमध्ये हळ्ळी म्हटले जाते. शेतकरी म्हणजे कुणबी तर बिगर शेतकऱ्याला अडाणी म्हणतात. दुसऱ्याची शेती खंडाने करणाऱ्याला उपरा तर जमिनीशी काहीही संबंध नसताना शेती कसणाऱ्याला पांढरपेशा म्हणतात. गावाकडे असणाऱ्या जमिनीला मिराशी तर तिचा भोगवटा करणाऱ्याला मिरासदार म्हणतात. मिरासी सोडून सरकारच्या वहिवाटीला राहिलेल्या जमिनीला खालसा म्हणतात. एखाद्या गावाचा महसूल वसूल करण्याचा अधिकार त्या गावातील जहागीरदाराकडे असतो त्या गावाला दुमाला म्हटले जाते. ज्याच्याकडे विशिष्ट कला, कुणबीकी नाही अशाला बेगार म्हटले गेले, त्यापासून बेकार शब्द आला. पडेल ते काम मिळेल त्या मोबदल्यावर करणाराला वेट्टी म्हणतात, त्यापासून वेठबिगार मडगांव शब्द आला. गावचा पट्ट धारण करणारा तो पाटील ही उपाधी पडली, पाटलास कन्नडमध्ये नाईक, गौडा किंवा बुधावंत तर गुजरातीत मुखी किंवा आगेवान म्हणतात. गावचे कुळ करणारा म्हणजे कुलकर्णी, चावडी भरवणे व गावची इतर कामे करण्यासाठी चौगुला असे. दहा किंवा अधिक पाटलावर एक देशमुख आणि त्याला मदत करण्यासाठी देशपांडे असे. देशमुखाला मिळणाऱ्या हक्काला मोईन म्हटले जाई. तर सरकारकडून रोख स्वरूपात जो मोबदला मिळत असे त्याला रुसूम म्हटले जाई. गावांची नावे वृक्ष, प्राणी, पक्षी, व्यक्ती अशा अनेकविध कारणांवरून पडली. मात्र विदर्भात सासू, सासरे, ताई, भाडभीड, थेरडी, कंडाळा अशीपण आहेत. लोकसंख्या आणि व्यवसायातून गावाची वाढ व्हायला लागली. त्यातून मूळ वस्त्यापेक्षा वाढीव वस्त्या मोठ्या व्हायला लागल्या. त्यामुळे एकाच नावाने दोन वस्त्या तयार झाल्या. यातील एका वस्तीला खुर्द तर दुसऱ्या वस्तीला बुद्रुक म्हटले गेले. त्यानुसार महाराष्ट्रात खुर्द आणि बुद्रुक नावाची जवळपास २६३८ गावे सापडतात. हे दोन्ही शब्द फारसी असून खुर्द म्हणजे किरकोळ, चिल्लर किंवा लहान असा होतो. तर बुद्रुक हा शब्द बुजुर्ग या शब्दावरून आला असून याचा अर्थ मोठा असा होतो. त्यानुसार एकाच गावाच्या दोन वस्त्या तयार झाल्यानंतर लहान वस्तीला खुर्द तर मोठ्या वस्तीला बुद्रुक म्हटले जाते. शहरीकरणामुळे ग्रामीण संस्कृती लोप पावत गेली, नाहीतरी प्राचीन कालखंडातील ग्रामव्यवस्था ही जगातील एक आदर्श प्रशासन व्यवस्था होती.


कुणबी व त्याला मदत करणारा बलुतेदार. त्यामुळे रोटी, कपडा और मकान यासारख्या गरजा तिथेच पूर्ण व्हायच्या, एवढेच काय जाग्यावरच न्यायनिवाडा व्हायचा. म्हणूनच म्हटले जाते गड्या आपला गाव भला. गावाचे नाव काही असो माणूस बुजुर्ग होत चालला आहे, तर त्याचे जीवनमात्र खुर्दा झाला आहे.